कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची दुरावस्था
कलाकारांना नाटकाच्या प्रयोगात सहन करावा लागला मनस्ताप
रंगमंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची केली मागणी
सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
कल्याण : कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुरवस्थेच्या विरोधात अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. याबाबत या नाटकाच्या कलाकारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. बोरगावकर यांनी देखील या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केडीएमसी प्रशासनाने नाट्यगृहाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृह हे शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे होत असतात. मात्र सध्या या नाट्यगृहातील सुविधांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये थिएटरमधील अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. अभिनेत्री श्रद्धा हांडेने वारंवार विजेच्या ठिणग्या पडत असल्याची माहिती दिली. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की नाटक मध्येच थांबवावे लागते. तिने सांगितले की, गेल्या काही वर्षांत तांत्रिक समस्यांमुळे थिएटर चार ते पाच वेळा थांबवावे लागले, ज्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही मोठी गैरसोय झाली.
अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले की, या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लॉकडाऊननंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते, मात्र त्या काळात नेमकी कोणती कामे झाली आणि खर्च केलेला निधी कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हा कलाकारांचा झालेला उद्रेक आहे, तो उद्रेक गांधीगिरीच्या माध्यमातून केला असून वारंवार तक्रार करून देखील लक्ष न दिल्याने हा उद्रेक झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्राद्वारे केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधणार असून आणि सभागृहात देखील याबाबत आवाज उठविणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले.
