मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा
मुंबई | ५ मे:
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला असून, ही कामे गतीने व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. या बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, तसेच पुरातत्व, परिवहन, महसूल, पर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध प्रलंबित प्रकल्प, त्यातील अडथळे आणि आवश्यक समन्वय यावर सखोल चर्चा करण्यात आली. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना दिलेल्या सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने सजगतेने आणि सहकार्याने कार्य करणे गरजेचे आहे.