डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवायला मला विधानसभेत पाठवा, सम्राट डोंगरदिवे..!
—————————————-
अकोला /मूर्तिजापूर :- मतदारसंघातील शेतकरी,कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविणे व विकासासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी मतदारांची साथ हवी आहे, अशी साद मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी मतदारांना घातली.
मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित जाहीर सभेत सम्राट डोंगरदिवे बोलत होते. सभेला अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, सुहास तिडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सुषमा कावरे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सौ रंजना सदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणाचे राज्य होते, इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले नसते तर आज मी इथे नसतो, गत १५ वर्षांपासून मी विकासाची कामे करीत असून, मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे. दारूच्या बाटलीवर, मटणाच्या बोटीवर पाचशेच्या नोटीवर मतदान विकणार आहात का..?
मतदारांनी पुढे येऊन २० तारखेला मतदान करावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी केले.
मतदारसंघात विविध समस्या असून, आरोग्य, शिक्षण, शेती, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येकाला शिक्षण मिळावे, रोजगार मिळावा यासाठी आपली साथ हवी असल्याचे ते म्हणाले. सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.