मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय – 2026 पर्यंत दिवसभर वीजपुरवठ्याचा विश्वास
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना दिवसाही अखंड वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या ‘कुसुम योजना’ला राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना’ची जोड दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या संयुक्त योजनेअंतर्गत आम्ही 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून यापैकी 4,000 मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रकल्पांवर काम वेगाने सुरू असून 2026 च्या अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दररोज 12 तास दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित केला जाईल.”
यामध्ये सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होणार आहे तसेच वीज दरांमध्येही स्थैर्य राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विश्वासही व्यक्त केला की, “राज्यातील शेतकरी वर्गाला वर्षभर सतत आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देण्यासाठी आमचा संपूर्ण प्रशासन कटिबद्ध आहे.”