“एक राष्ट्र – एक कृषी – एक टीम” धोरणाने काम करणार कृषी विभाग – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा
जलयुक्त शिवार मोहिमेचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे योगदान अमूल्य – कृषीमंत्र्यांकडून गौरव
नवी दिल्ली / मुंबई – भारतातील मेहनती शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला न्याय देण्यासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्व संबंधित संस्थांनी मिशन मोडवर एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत, “एक राष्ट्र – एक कृषी – एक टीम” या नवीन दृष्टिकोनातून कृषी विभाग कार्य करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी केली.
कृषीमंत्री चौहान यांनी सांगितले की, “आमचे शेतकरी अत्यंत मेहनती आहेत. त्यांच्या जीवनात शाश्वत बदल घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. कृषी धोरण, संशोधन आणि शेतीसंदर्भातील योजना या सर्वांमध्ये समन्वय साधून, एकसंधतेने काम होणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलयुक्त शिवार अभियानातील योगदान देखील विशेषतः अधोरेखित केले. चौहान म्हणाले, “श्री. फडणवीस यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात जे कार्य केले आहे, ते अद्वितीय आहे. जलयुक्त शिवार महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरले आहे. शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेतून बळ मिळाले आणि शेतीचा उत्पादनक्षमतेतही वाढ झाली.”
मुख्यमंत्री फडणवीस यांची कार्यशैली संयमित, धैर्यशील आणि संकल्पबद्ध असल्याचे सांगत कृषीमंत्र्यांनी त्यांची प्रशंसा केली. “कोणत्याही आव्हानात ते कधीही डगमगले नाहीत,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.