“ऑपरेशन सिंदूरने भारताची ताकद जगाला दाखवली” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तिरंगा रॅलीत गौरव
नागपूर, खापरखेडा:
ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतीय सैन्याने दिलेल्या यशाने संपूर्ण देशात गौरवाची भावना निर्माण केली असून, या मोहिमेत पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ दिला नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
खापरखेडा येथे आयोजित तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, तसेच चरणसिंग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“ही लढाई केवळ सैनिकी नव्हे, तर आत्मनिर्भर भारताचीही लढाई होती. देशातच तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून जिंकलेले हे युद्ध ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या पथदर्शक संकल्पनांची साक्ष देणारे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले.”
त्यांनी पुढे सांगितले की,
“आज संपूर्ण जग भारताच्या सामर्थ्याकडे आदराने पाहत आहे. हे यश केवळ सैन्याचं नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या एकतेचे प्रतीक आहे.“
तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रॅलीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला होता आणि सर्वत्र राष्ट्रप्रेमाचा माहोल अनुभवायला मिळाला.