आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात टपाल पेटी उपाशीच..!
वैज्ञानिक युगातील नव्या पिढीला पडला टपाल पेटीचा विसर..
पत्र पेटी इतिहासात जमा होण्याच्या मार्गात..
—————————————-
अकोला :- “डाकिया डाक लाया, खुशीका पयाम कही, कही दर्दनाक …..’ हे गाणं ऐकलं की आज असं वाटतं की एकेकाळी टपालाची वाट पाहायला लावणाऱ्या टपाल विभागाच्या टपाल पेटीलाच आज टपालाची वाट पहाण्याची जणू वेळ आली आहे.
कधीकाळी पत्रपेटीचे (जागा) पोट भरून अजीर्ण व्हायचे तर आज यही पेटीच उपाशी आहे. तंत्र युगाच्या काळात पत्रपेटी ही अडगळीची झाली आहे.
जागतिक पोस्ट दिवस ९ ऑक्टोबर रोजी देशभरात साजरा केला जातो. पूर्वी एकमेकांचे सुख दुःखाचे संदेश पोहोचवण्याची सुविधा म्हणजे टपाल विभाग होते. पत्र, आंतरदेशीय पत्र तर कागदावर माहिती संदेश लिहून लिफाफावर तिकीटे लावून टपाल पेटीत पत्र टाकली जात होते. टपाल पेटीमध्ये घरातील मंगल कार्य, मनातील सुख दुःखाच्या भावना व्यक्त करणारे संदेश असणारी टपाल पेटी शहरांसह गाव – खेडेगावात होती. यामध्ये सुमारे ७० ते ८० टक्के पोस्ट कार्यालय ग्रामीण भागामध्ये असायचे. खेडेगावामध्ये टपालपेटी
झाडांवर लटकवलेली दिसायची. सध्या या पत्रपेटीची स्थिती बिकट झाली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारतीय पोस्ट विभागाच्या पत्रपेटीचे महत्त्व काय आहे, त्याचा वापर किती जण करतात, हा कुतूहलाचा विषय असला, तरी स्मार्टफोनच्या या काळात टपाल पेटीचा वापर इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. तर टपाल पेटीची अथवा पोस्टमन काकांची जागा ही आता व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाने घेतली असून,आजच्या नव्या पिढीला पत्र आणि पत्रातील भावना समजून घेणारी पत्रपेटीच माहीत नाही. मोबाईलच्या अत्याधुनिक स्मार्टफोनवर बोटं फिरतात आणि एका सेकंदात संपर्क होऊन संदेश पोहोचला जातो. त्यामुळे पत्र लिहिण्याचा अथवा वाचण्याची वेळही इतिहास जमा झाली आहे.
पत्र लिहिण्याचा किंवा लिहीताना कमी शब्दांमध्ये संपूर्ण माहिती व्यक्त करताना मिळणारा आनंद, पत्र येण्याची वाट पाहण्यातील ओढ, हुरहूर या सगळ्याला नवीन पिढी मुकली आहे. गावोगावी डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये पत्र संदेश पोहोचवणाऱ्या पोस्टमनला देवदूत समजत होते. आज तेही आठवणीमध्ये उरले आहेत. कधीकाळी पत्रांनी भरणाऱ्या टपाल पेटीलाच आज टपालाची वाट पहावी लागते. तर टपाल पेटी ही दिसेनासी झाली आहे. एकेकाळी सुख दुःखाचे संदेश पोहोचवणारे टपाल कार्यातील पोस्टमन वर गाजलेली गाणी आठवतात, ती आता ऐकण्यापुरतीच राहिली आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.