उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी
नमुंमपा उष्णतेबाबत मार्गदर्शक सूचना
भारतातील अनेक राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडयात उष्णतेच्या लाटांना (Heat Wave) अधिसूचित आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य हे देखील उष्णतेचा धोका असणारे देशातील टॉप टेन मधील संवेदनशील राज्य आहे. त्यामुळे नवी मुंबई कार्यक्षेत्रात सदयस्थितीत वाढत्या तापमानामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांनी उष्माघात व उष्णताजन्य आजार टाळण्यासाठी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारे परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये क्षेत्रीय कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी शक्यतो दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, तसेच क्षेत्रीय कामाकरिता शक्यतो सकाळी 11.00 पूर्वी किवा सायंकाळी 4.00 नंतर बाहेर पडावे असे सूचित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे अत्यावश्यक / आपत्कालीन कामासाठी बाहेर जाणे आवश्यक असल्यास उष्णतेच्या अलर्ट कालावधीत उष्णतेपासून बचावाकरिता योग्य तो काळजी घेऊन बाहेर पडावे असे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत संबंधित विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख यांनी विविध विभागांतील क्षेत्रीय स्तरावर कंत्राटी / तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या कामगारांची उष्णतेच्या अॅलर्ट कालावधीत योग्य ती काळजी घ्यावी.
सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे तसेच ओआरएस, लिंबूपाणी, ताक अशा द्रवपदार्थाचे सेवन करावे.
हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना टोपी, रुमाल अथवा छत्रीचा वापर करावा.
कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यस्थळी अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या थंड पाण्याची व आवश्यक प्राथमिक उपचाराची व्यवस्था उपलब्ध ठेवावी.
उष्माघाताची चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, जास्त घाम येणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांची प्रकृती बिघडल्यास संबंधित विभाग प्रमुखांनी तात्काळ आवश्यक ती उपचार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी.
– असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
