” बंद करो सब काम, २० तारीख को करो मतदान ” चा नारा देत विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती रॅली..!
—————————————-
अकोला /मूर्तिजापूर :- महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, यासाठी मूर्तिजापूर येथील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शहरातून रॅली काढून मतदान जनजागृती केली. निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन यावेळी गट विकास अधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी अशोक बांगर यांनी केले.
निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मूर्तिजापूर शहरातील विविध १० शाळेच्या वतीने ही भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती. विविध घोषणा वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.
” मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो; मतदान करा, मतदान हा आपला अधिकार,” २० नोव्हेंबरला प्रत्येकानं मतदान केंद्रावर जावं, अशा स्वरूपात मतदान जनजागृती करणारे संदेश चिमुकल्यांनी रॅलीमधून दिले. या रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी
अशोक बांगर सहा. निवडणूक अधिकारी तथा गट विकास अधिकारी,शेषराव टाले मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी, संजय मोरे गट शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी,राजेश भुगुल प्रकल्प अधिकारी न. प मूर्तिजापूर, अली सर स्विप सदस्य तथा
विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.