अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार..!
—————————————-
अकोला :- राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, येत्या दोन दिवसांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने घट होत आहे. यामध्ये अधिक घट होऊन येत्या काही दिवसांत हंगामातील एक आकडी किमान तापमान नोंदवले जाऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात थंडीने दणक्यात आगमन केले असून, दोन दिवसापासून तापमानाचा पारा घसरू लागला आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू लागल्याने नागरिक आता पहाटे व रात्रीच्या वेळी चौका-चौकात शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना नजरेस पडत आहेत.
या सोबतच मराठवाडा आणि विदर्भात देखील तापमानात घट झाली आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री कमालीची थंडी जाणवत आहे. यामुळे आता नागरिकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.मात्र आता वातावरणात बदल झाल्याने थंडीची लाट आली आहे. जिल्ह्यातील किमान तापमानात देखील घट झाली आहे. शहरी भागातील नागरिक या गुलाबी थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्याचे हवामान कोरडे राहणार आहे. तर पूढील पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नाही असे हवामान विभागाच्या वतीने ट्विटर च्या माध्यमातून माहिती दिलीये.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.