शेतकरी बांधवांसाठी रविकांत तुपकर उतरले रस्त्यावर…!
___________
* मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीचा जन आक्रोश मोर्चा..
* मुर्तीजापुर व बार्शीटाकळी तालुक्यातील हजारो शेतकरी मोर्चेत सहभागी..
___________
अकोला/ मूर्तिजापूर :- यावर्षी सततच्या पावसाने मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न नाही, शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यावर्षी कधी नव्हे ते शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने प्रति क्विंटल ३ हजार रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही यासाठी सरकारच जबाबदार असून, शासनाने सोयाबीन पेंड आयातीवर बंदी घालून सोयाबीन पेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा, कापसाला १२ हजार तर सोयाबीनला ७ हजार भाव द्यावा यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी हा शेतकरी मोर्चा असल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नाही तर त्या कंपनीचे कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही, असा गर्भित इशारा यावेळी तुपकरांनी दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाची, कर्जबाजारीपणाची रुमण्याने दहीहंडी फोडली.
जुना बाजार समिती येथून या दहीहंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या मोर्चाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमरावती, बीड, पातूर, कारंजा, वाशिम येथील शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी गजानन अमदाबादकर, डॉ. श्रीकांत तिडके, चंद्रशेखर गवळी यांनीही शेतकऱ्यांशी हितगुज केली.
___________
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.