
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्री शिव आरती केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, निलेश राणे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राजकोट येथील शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद व समाधान आहे. मागील दुर्दैवी घटनेनंतर, शिवरायांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्धार केला. आज पुतळ्याचे पूजन केले, असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.
कोकणातील विविध प्रकारच्या वादळांच्या तीव्रतेचा अभ्यास करुन, पुतळ्याची रचना केली आहे. पुतळ्याची उंची ६० फूट, तलवारीसह ८३ फूट व जमिनीपासूनची उंची ९३ फूट आहे. किमान १०० वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल असा मजबूत पुतळा आहे.
या परिसरातील उपलब्ध जमिनींचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या केल्या जातील. येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, असा परिसराचा विकास केला जाईल. कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी परिसरातील महापुरुष मंदिरामध्ये दर्शनही घेतले.