अमरावती येथील नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक..!
___________
अमरावती :- उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेल्या संतप्त जमावाने दगडफेक केली. सुमारे पाचशे ते सातशे विशिष्ट धर्मीयांचा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर चालून गेला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर अश्रुदुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी
अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
तूर्तास नागपुरी गेट पोलीस ठाणे परिसरामध्ये तणावपूर्ण
स्थिती बदली आहे. यती नरसिंह नंद सरस्वती यांनी 29
सप्टेंबर रोजी गाजियाबाद येथे बोलत असताना विशिष्ट धर्मीयांविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केली होती. त्या टिपणीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करावा या मागणीसाठी एक मोठा जमाव नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एकत्र आला. ड्युटीवरील पोलीस अंमलदार घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच जमावातील काही लोक अचानक संतप्त झाले. त्यातील काहींनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येत आवार व परिसरामध्ये मोठी दगडफेक केली. त्यामुळे क्षणात तणावाची स्थिती निर्माण झाली. नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागुंडावार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जमाव ऐकायला तयार
नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जमावाच्या दिशेने अश्रुदुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान काही अज्ञात तत्त्वांनी परिसरामध्ये जाळपोळ केल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. मात्र त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. संबंधित महंत व पोलीस स्टेशनमध्ये धुडबुज घालणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उशिरा
रात्रीपर्यंत नागपुरी गेट ठाण्याच्या परिसरामध्ये
तणावपूर्ण स्थिती होती.
___________
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अमरावती.