मुंबई विधानसभा निवडणुका: कुर्ला मतदारसंघात ठाकरे गटासमोर अंतर्गत विरोध
मुंबई: विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यामुळे सर्व पक्षांमध्ये उमेदवारीच्या चर्चांना जोर आला आहे. भारतीय जनता पक्षानं पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे, तर इतर पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, विविध मतदारसंघांत गटबाजीचे वाद समोर येत आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासमोर ठाकरे गटाचे अंतर्गत वाद दिसून येत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय, ज्यामुळे माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
कुरेशीनगर येथील नागरिकांचा विरोध प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिल्यास, कुर्ला कुरेशीनगर येथील स्थानिक नागरिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. याआधीही कुर्ल्यातील मराठा समाजाने त्यांची उमेदवारी विरोधात आवाज उठवला होता. आता कुरेशीनगरमधील मुस्लिम समाजानेही त्यांचा विरोध सुरू केल्यामुळे, मोरजकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जातंय.
मुस्लिम समाजाची असंतुष्टी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता, पण विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज ठाकरे गटापासून दूर जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी मिळाल्यास, कुरेशीनगरमधील मुस्लिम समाजाच्या मतांचा आधार ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता कमी आहे.
उमेदवारीविरोधात काँग्रेसचे स्थानिक नेते या संदर्भात बोलताना, काँग्रेसच्या कुर्ला विभागाचे उपाध्यक्ष नबी रहीम खान यांनी सांगितलं की, “कुरेशीनगरमधील नागरिकांनी मागील 60 वर्षांपासून वापरत असलेल्या मुख्य रस्त्याचा वापर प्रविणा मोरजकर यांनी आपल्या राजकीय ताकदीचा उपयोग करून स्थानिक बांधकाम व्यावसायिकाला दिला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. जर प्रविणा मोरजकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली, तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही.”
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील ही अंतर्गत गटबाजी आणि नागरिकांचा विरोध, आगामी निवडणुकीत ठाकरे गटासाठी एक मोठं आव्हान बनू शकतं.