जीबीएस आजाराचा अकोल्यात शिरकाव..!
—————————————-
अकोला :- जिल्ह्यामध्ये जानेवारीपर्यंत जीबीएस या आजाराचे संशयित ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित दोन रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी एक रुग्ण (वय २२ वर्ष, लिंग पुरुष) हा शिवणी, अकोला येथील, तर दुसरा रुग्ण (वय ५५ वर्ष, लिंग पुरुष) हा अकोट येथील आहे. हे दोन्ही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचार घेत असल्याची माहिती आहे.
जीबीएस आजाराला घाबरु नका, काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी अजित कुंभार
राज्यातील पुणे महानगरपालीका व नजिकच्या काही जिल्ह्यांमध्ये ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची वाढ लक्षात घेता जिल्ह्यामध्ये अशा रुग्णांची हाताळणी करण्यासाठी एसओपीची परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. या आजाराला नागरिकांनी घाबरू नये. पुरेशी दक्षता घ्यावी. लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधात्मक व सक्रिय सर्वेक्षणात्मक कार्यवाही अंमलात आणण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.