मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशला ‘जागतिक आर्थिक केंद्र’
म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात एमएमआर वर्ल्ड ईकॉनॉमी हबसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
या करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लॉस श्वाब यांनी स्वाक्षरी केल्या व करारांचे अदान-प्रदान केले. यावेळी मंत्री सर्वश्री उदय सामंत, दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
राज्याच्या विकासासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला बळ मिळेल अशी संकल्पना घेऊन निती आयोग पुढे आला आहे. मुंबई ही भविष्यात ग्लोबल फिनटेक कॅपिटल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे. अटल सेतु – एमटीएचल या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टेक्नॉलॉजी हब या परिसरात उभे होत आहे.- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक प्रा. क्लॉस श्वाब यांनी निती आयोगाच्या अहवालाचे आणि एमएमआर जागतिक आर्थिक केंद्र निर्माणासाठी सुरु असलेल्या अमंलबजावणीचे कौतुक करुन मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला.