*नवी मुंबई महानगरपालिका*
प्रसिध्दीकरिता
दि. 16 मे 2026
*’घनकचरा व्यवस्थापन नियम 2026′ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार*
‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत नियमित क्रमवारीत सातत्याने पहिले तीन क्रमांक संपादन करणा-या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांची ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आलेली आहे. यामध्ये समाविष्ट देशातील 4 शहरांमध्ये नवी मुंबईचा अग्रक्रमाने समावेश असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ ला सामोरे जाताना ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील आपले उच्च मानांकन कायम राखण्यासाठी सर्वांच्या सहयोगाने नवी मुंबई सज्ज झालेली आहे.
आत्तापर्यंत शहर स्वच्छतमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार कार्यवाही करण्यात येत होती. त्यामध्ये कचरा संकलन, त्याची वाहतुक, प्रक्रिया आणि सुयोग्य विल्हेवाट अशा जबाबदा-या प्राधिकरणांवर निश्चित होत्या. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वच बाबतीत स्वत:चे वेगळेपण सिध्द केले आहे.
आता 1 एप्रिल 2026 पासून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश मा.सर्वोच्च न्यायालयाने पारित केले आहेत. ही नियमावली देशातील सर्व शासकीय, निमशासकीय प्राधिकरणे व स्थानिक स्वराज्य संस्था यांना बंधनकारक आहे.
या नवीन नियमांमध्ये महानगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचाही प्रत्यक्ष सहभाग व जबाबदारी अधोरेखित करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नगरसेवक आणि सोसायट्या – संस्था यांना पत्र लिहून या नवीन नियमावलीची माहिती करून दिलेली आहे. यामध्ये स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या सहजसोप्या सवयी दैनंदिन जीवनात नियमितपणे अंगिकारणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करीत स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर लोकप्रतिनिधी आणि नागरिक याकामी संपूर्ण सहयोग देतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. या अंतर्गत –
l सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करावी तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणेबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांच्या मनात ‘माझं शहर – माझा सहभाग’ हा संदेश रूजविण्यासाठी व त्यांचा सक्रिय सहभाग वाढण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. स्थानिक पातळीवर नियमांची अंमलबजावणी होत असल्याची जबाबदारीही लोकप्रतिनिधींवर सोपविण्यात आलेली आहे.
l नागरिकांनी दररोज कचरा घरातूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी असा 4 प्रकारे वेगवेगळा ठेवावा.
l नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये देतानाही हा 4 प्रकारचा कचरा वेगवेगळा देण्यात यावा.
l घरातील ओल्या कच-याचे नागरिकांनी कंपोस्ट बास्केट अथवा इतर साहित्य वापरून खतात रुपांतरण करावे व
त्याचा उपयोग घरातील फुलझाडे अथवा सोसायटीच्या आवारातील झाडांसाठी करावा.
l प्रतिदिन 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्मिती करणा-या किंवा 20 हजार चौ.मी.पेक्षा जास्त बांधकाम असलेल्या अथवा दैनंदिन 40 हजार लिटर पेक्षा जास्त पाणी वापरणा-या सोसायट्या, वसाहती, हॉटेल्स, मार्केट्स, संस्था यांनी आपल्या आवारातच कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करून, कच-यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबवावेत. या सर्व घटकांनी नवीन नियमानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावयाचे आहे तसेच 30 जून पर्यंत रिटर्न फाईल करावयाचे आहेत.
सध्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ अंतर्गत शहर स्वच्छतेविषयी ‘नागरिकांचा अभिप्राय (Citizen Feedback)’ घेण्यास सुरूवात झालेली आहे. या अनुषंगाने cf.sbmurban.org या लिंकवर जाऊन शहर स्वच्छतेशी संबंधित 13 प्रश्नांची नागरिकांनी सर्वोत्तम उत्तरे द्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
नवीन नियमानुसार स्वच्छताकार्यात सामुहिक प्रयत्न असायला हवेत हे स्पष्ट करीत प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहील आणि शहर स्वच्छतेला अधिक गती येईल व गुणवत्ता वाढेल असा विश्वास व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 चे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.
