दिव्यांग कलाकारों के लिए विशेष कला कार्यशाला का समापन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल रहे मुख्य अतिथि

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या सहकार्याने तसेच आयसोवा आणि निपिड यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचा समारोप मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
दिव्यांग कलाकारांमधील सर्जनशीलता, जिद्द आणि कौशल्य ओळखून त्यांना योग्य मंच उपलब्ध करून दिल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतात. यासाठी दिव्यांग कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतःहून कौशल्य आत्मसात करत असलेल्या अनेक दिव्यांग कलाकारांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ते अधिक सक्षमपणे पुढे येऊ शकतात. संबंधित संस्थांनी अशा कलाकारांसाठी विशेष उपक्रम, प्रशिक्षण तसेच प्रदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी दिव्यांग कलाकारांशी संवाद साधत त्यांनी तयार केलेल्या चित्रांची पाहणी केली. तसेच दिव्यांग कलाकारांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यशाळेस #दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, ‘आयसोवा’च्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे कुलगुरू प्रा. हिम कुमार चॅटर्जी, निपीडचे संचालक डॉ. बी. व्ही. रामकुमार, ‘आयसोवा’च्या सदस्य डॉ. लीना गुप्ता, अर्चना श्रीवास्तव, झेबा नाईक तसेच दिव्यांग कलाकार व पालक उपस्थित होते.
या कार्यशाळेत मुंबई व परिसरातील १८ पेक्षा अधिक संस्थांतील ४२ दिव्यांग कलाकार सहभागी झाले होते. कार्यशाळेत रेखाटलेल्या कलाकृतींचे #चित्रप्रदर्शन १० एप्रिल २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात सर्वांसाठी खुले राहणार आहे.

