बांधकाम कामगार नोंदणी करिता मूर्तिजापूरात दलालांकडून मजुरांची लूट..!
CEN News ने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये झाले उघड..
———————————-
मूर्तिजापूर :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर एका दलाला कडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. मंडळाचे स्वत:चे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. याअंतर्गत नगर परिषद च्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येथे येतात. मात्र त्यांना नोंदणी ची फाईल करून देण्याचे चक्क १००० ते १५०० रुपये लागतात असे सांगितल्या जात आहे. हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालय च्या नावाने एका दलालाने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे. कुठल्याही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोर गरीब मजु्रांकडून हे दलाल १००० ते १५०० रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या CEN News या वृत्तवाहिनीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये समोर आला आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्याअंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ, कुटुंबातील लग्न, गरोदर महिला, नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, मजुरांना अवजारे, साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते. यासाठी अर्ज मोफत आहेत. पाच वर्षांतून एकदाच ८५ रूपये नोंदणी शुल्क भरावे लागते. त्यानंतर प्रत्येक वर्षात जीवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. यासाठी वर्षातून किमान ९० दिवस काम केल्याचा पुरावा असल्याचे हे प्रमाणपत्र असते. नगर परिषद च्या अभियंत्यांकडून हे प्रमाणपत्र मिळते. मात्र याचा फायदा घेत मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम कामगार नोंदणी चे फलक लावून एक दलाल चक्क बांधकाम मजुरांकडून नोंदणीच्या नावाखाली १००० ते १५०० रुपये घेत आहे. नोंदणी करण्याकरीता महिलांची ही मोठी गर्दी दिसून येते विशेष म्हणजे या दलालास पैसे दिल्यानंतर फक्त आधार कार्ड देण्याची गरज आहे बाकी सर्व हा दलालच करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी सदर दलाला कडून बांधकाम कामगार नोंदणी करिता मजुरांकडून पैसे उकळल्या जात असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले मात्र उपविभागीय अधिकारी यांनी “आमच्याकडे कुठलीही तक्रार नाही, पहिले त्याबाबत तक्रारदारास तक्रार देण्यास सांगणार नंतर बघू” असे सांगून वेळ साधली आता यावर अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जातीने लक्ष घालून बांधकाम कामगार नोंदणीचे होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.