काळया फिती लावून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू…!
सदरचे प्रमाणपत्र न दिल्याचे पडसाद तालुक्यात उमटले
अकोला – बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांवर दबाव टाकण्यात येत आहे. याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारचे निर्देश प्राप्त नसल्यानंतर सुद्धा ग्रामसेवकांवर बळजबरी करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा मूर्तिजापूरच्या वतीने दिनांक ९ सप्टेंबर पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नसल्यानंतर सुद्धा ग्रामसेवकांवर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप ग्रामसेवक करत आहेत. याबाबत दोन वर्षापासून कामगार मंडळ व शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले. परंतु मार्गदर्शन प्राप्त झाले नाही. त्यामुळे ग्रामसेवकांवर प्रमाणपत्र देण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. राज्यात कुठेही याबाबत सक्ती करण्यात आली नाही. बहुतांश गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत ग्रामसेवकांना अधिकार नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. परंतु अकोला जिल्ह्यात मात्र ग्रामसेवकांवर दबाव टाकण्यात येत असल्याने व सदरच्या प्रमाणपत्राबाबत तालुक्यातील कुरूम ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांस कार्यालयात बडजबरीने डांबून ठेवण्यात आल्याची घटना घडल्याने ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून सोमवार दिनांक ९ सप्टेंबर पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी संघटनेच्या तालुका शाखेचे पुरुष/ महिलां पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला