ख्रिसमस ट्री व सांताने बहरला बाजारपेठ..!
मुंबई :- नाताळ सणासाठी बाजारात विविध आकारांतील ख्रिसमस ट्री, बेल, रिंग अशा विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच सजवलेल्या आकर्षक अशा ख्रिसमस ट्रीने दादरची बाजारपेठ बहरून गेली आहे.
नाताळ सण हा अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असताना नाताळच्या सणानिमित्त घरी सजावटीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या दादर येथील रानडे रोड ते आयडियल गल्लीतील व मुंबईतील मज्जीद बंदर बाजारात विक्रीसाठी आलेल्या ख्रिसमस ट्री त्याला लावलेले लाल, सोनेरी, चंदेरी बेल्स, रिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक आणि सजावट केलेल्या ख्रिसमस ट्री, लाईटचे तोरण असलेल्या ख्रिस्मस ट्रीची किंमत १०० रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे.
नाताळ म्हटले की स्टार कंदील आलाच. नाताळच्या सणात स्टार कंदिलाला खूप महत्त्व असते. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या घरात कंदील लावलेला दिसून येतो. अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी कंदिलांनी दादरचा बाजार सजला आहे. विविध प्रकारची लाईटची तोरणे, विजेची बचत करणारी शोभेची तोरणे बाजारात विक्रीकरिता आली आहेत. त्याचप्रमाणे सजावटीसाठी आकर्षक रिंग, शोभिवंत फुले यांनीदेखील बाजार फुलून गेला आहे. तर सांताच्या मास्कला मागणी नाताळाच्या सणात बच्चेकंपनीमध्ये सांताक्लॉजचे आकर्षण असते. त्यामुळे सांताक्लॉजच्या मास्कला आणि टोपीला मोठी मागणी असते. त्यामुळे सांताक्लॉजचे मास्क आणि टोपी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी ५ टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत; मात्र ग्राहकांचा प्रतिसाददेखील चांगला मिळत आहे. ग्राहक खरेदीकरिता येऊ लागले आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुंबई.