मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे दि. ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.
वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी नालेसफाईच्या कामाच्या पाहणीवेळी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास नालेसफाईच्या कामाच्या पाहणीस सुरूवात केली. भांडुप येथील उषा नगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.