पारंपारिक वाद्यांच्या तालावर गणरायाचे मूर्तिजापुरात आगमन…!
____________
अकोला :- ‘गणपत्ती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात शनिवारी घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांसह मूर्तिजापूरकरांनी बाप्पांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. शहरा सह उपनगरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत गणरायांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यामुळे अाबालवृध्दांचा उत्साह द्विगुणीत झाला. पुढील नऊ दिवस अवघे मूर्तिजापूर शहर गणेशमय होणार आहे.
मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या हस्ते गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहर पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी वर्ग, होमगार्ड व पत्रकार बांधव उपस्थित होते.
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची सामुदायिक महा आरती त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
बाप्पांच्या स्वागताचा थाटमाट पाहता नगरकरांची बाप्पावर असलेली नितांत श्रद्धा, तसेच तोच खरा विघ्नहर्ता असल्याचा विश्वास शनिवारी ठायी-ठायी जाणवत होता. शहरात उपनगरांत ठिकठिकाणी गणरायांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. सनई-चौघड्यांचा ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९० तर २ हजार हून अधिक घरगुती गणेश स्थापना करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली.
बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक ती तयारी नगरकरांची शुक्रवारी पूर्ण केली होती. सकाळपासूनच घरोघरी गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरु होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मंगळवार बाजार, भगतसिंग चौक आदी भागात गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. ‘मोरया मोरया…मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषामुळे अवघे मूर्तिजापूर शहर शनिवारी दिवसभर मंगलमय झाले होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली, हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
____________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.