अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाला ५० वर्षे पूर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
अंबाजोगाई, बीड:
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य संस्थेने यंदा आपली ५० वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. या गौरवशाली प्रसंगी संस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व पायाभूत सुविधा निर्मितीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
आज आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, उपलब्ध निधीतून प्राधान्यक्रम निश्चित करून सुविधा निर्मिती करावी, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
या बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, अक्षय मुंदडा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आरोग्य सहसंचालक डॉ. शिल्पा दमकुंडवार, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.