स्वच्छताप्रेमी, सुसंस्कृत नागरिकांचे नवी मुंबई शहर ही ओळख दृढ होण्यासाठी स्वच्छता आवाहन

स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांची दैनंदिन सवय व्हावी या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासून शहर स्वच्छतेसाठी सकारात्मक काम करीत असून...

7

स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांची दैनंदिन सवय व्हावी या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासून शहर स्वच्छतेसाठी सकारात्मक काम करीत असून सुरुवातीला राज्य शासनामार्फत राबविले जाणारे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व सध्याचे देशपातळीवरील स्वच्छ भारत अभियान यामध्ये सक्रीय सहभागी होत नवी मुंबई शहर नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

मागील वर्षीही स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहराचा बहुमान प्राप्त झालेले नवी मुंबई शहर यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2019 करीता सज्ज झालेले आहे. यामध्ये नागरिकांच्या सक्रीय सहभागाचे महत्व लक्षात घेऊन संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध विभागात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.

शहरातील सार्वजनिक जागा दररोज स्वच्छ करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिका लक्ष देत असून यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही व आपल्या घरातील कचरा घरातच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवून महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांतही तो वेगवेगळाच देण्याची नियमित कार्यवाही केली पाहिजे.

कचरा गाड्यांमध्ये संकलीत होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळ्या गाड्यांमध्ये संकलीत होतो तसेच काही कचरागाड्यांमध्ये ओल्या व सुक्या कच-यासाठी दोन स्वतंत्र कप्पे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच कचरा वेगवेगळा देणे गरजेचे आहे. हा कचरा गाड्यांमध्ये संकलित कचरा दररोज देशातील सर्वोत्तम असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी आणला जातो व या ओल्या आणि सुक्या कच-यावर वेगवेगळ्या स्वरुपात 100 टक्के सुयोग्य प्रक्रिया केली जात आहे. यामधील ओल्या कच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते व सुक्या कच-यावर पुनर्प्रक्रिया करून ग्रॅन्युल्स व फ्युएल पॅलेट्स तयार केले जातात. याकरीता नागरिकांनी कचरा देतानाच तो ओला व सुका असा वेगवेगळा देण्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी 500 पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांमार्फतही ही शौचालये स्वच्छ राहतील, आतील सामानांची मोडतोड होणार नाही व शौचालयाचा परिसरही स्वच्छ राहील याकरीता विशेष सहकार्याची अपेक्षा आहे. ही सर्व शौचालये गुगल मॅपवर प्रदर्शित होत असून नागरिकांनी व शहरात येणा-या प्रवाशांनी त्याचा उपयोग करावा, उघड्यावर विधी करू नयेत व तशाप्रकारे कोणी आढळल्यास त्याला परावृत्त करावे व शहर स्वच्छतेत आपले योगदान देणेही महत्वाचे आहे. नवी मुंबई महानगरपालिका हागणदारीमुक्त (ओ.डी.एफ. फ्री) म्हणून मान्यताप्राप्त असून हागणदारीमुक्त डबल प्लस (ओ.डी.एफ. फ्री डबल प्लस) मानांकनासाठी पात्र आहे. त्यामुळे नागरिकांचे याबाबत सहकार्य अत्यंत अनिर्वाय आहे.

याशिवाय नागरिकांनी साध्या साध्या गोष्टीतून निर्माण होणारा आपल्याकडील कचरा कुठेही न टाकता सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेने बसविलेल्या 750 हून अधिक लिटरबिन्स मध्येच टाकल्यास शहर अस्वच्छ दिसणार नाही व कच-याचेही संकलन व्यवस्थित रितीने होईल.

नवी मुंबई या आधुनिक शहराची सुशिक्षितांचे शहर म्हणून वेगळी ओळख असून या शहराला स्वच्छतेत देशामघ्ये अग्र मानांकन मिळवून देऊन नवी मुंबई शहर सुसंस्कृत, स्वच्छताप्रेमी शहर आहे अशीही वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छता कार्यात अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींतून आपला सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.