वन महोत्सवात 1 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन – आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केली पाहणी

29

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने वन विभागाच्या पुढाकारातून गतवर्षीप्रमाणेच 1 जुलै पासून ‘वनमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून जुलै महिन्यात संपूर्ण राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

       या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या 1 लक्ष वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी वृक्षप्राधिकरण सदस्य व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच वन विभाग आणि वन विकास महामंडळ यांच्या अधिकारीवर्गासह वृक्षारोपण करावायाच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली व वृक्षारोपणाचे नियोजन केले. या पाहणी दौ-याप्रसंगी आयुक्तांसमवेत सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेते श्री. विजय चौगुले, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, श्री.बहादूर बिस्ट, श्रीम. उषा पाटील आदी वृक्ष प्राधिकरण सदस्य तसेच वृक्ष प्राधिकरण सचिव उपआयुक्त श्री. तुषार पवार, वन विभागाचे अधिकारी श्री. देशमुख, वन विकास महामंडळाचे अधिकारी श्री. गौड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

      यामध्ये इलठणपाडा, यादवनगर, रबाले, सुलाई माता डौगर व गवळीदेव डोंगर परिसराची पाहणी करून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. सदर भाग हा वन विभागाच्या अखत्यारित असल्याने वन विभाग व नवी मुंबई महानगरपालिका आणि वन विकास महामंडळ यांनी त्रिपक्षीय करार करून हे वृक्षारोपण करावे यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सदर पाहणी दरम्यान गवळीदेव पर्यटन स्थळ विकसित करणेबाबतही विचारविनीमय करण्यात आला व त्यादृष्टीने पाहणी करण्यात आली.

      1 जुलै 2018 पासून सुरू होणा-या वन महोत्सवामध्ये नागरिकांना  मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर दिला जाणार आहे. यादृष्टीने पावसाळी कालावधीत आपल्या आवारात वृक्षारोपण करू इच्छित असणा-या सोसायट्या, वसाहती यांना महानगरपालिकेच्या रोपवाटिकेतून मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमांतून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये वृक्षप्रेमाची व पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती करण्याचा मनोदय महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.