नवी मुंबई महानगरपालिका

प्रसिध्दीकरीता दि. 16/05/2018

29

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ मध्ये केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नवी मुंबई महानगरपालिका  ‘घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे मानांकन लाभण्यात स्वच्छतेचे महत्व पटलेल्या व ते प्रत्यक्ष कृतीत आणणा-या प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचा अत्यंत मोलाचा वाटा असल्याने नवी मुंबईकर जनतेचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घेणा-या सोसायट्या, संस्था, हॉटेल्स तसेच विविध उपक्रम आयोजनात योगदान देणा-या घटकांना अभिनंदनपत्र पाठवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

      स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे उत्साहवर्धक चित्र पहायला मिळाले, म्हणूनच हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे आहे अशा शब्दात सारे श्रेय सर्वांनी एकजुटीने केलेल्या कामाला देत आयुक्तांनी सर्व घटकांचे आभार मानले आहेत.

      ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सामोरे जाताना प्रत्येक नागरिकाने “माझा कचरा – माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून आपले सक्रीय योगदान दिले. नागरिकांनी आपल्या घरात निर्माण होणारा कचरा घरापासूनच ओला व सुका वेगवेगळा करण्यास सुरूवात केली. नवी मुंबईत कचरा वर्गीकरणाचे 85 टक्के इतके प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचा अभिप्राय स्वच्छ सर्वेक्षणाच्या केंद्रीय समितीने दिला. अनेक नागरिक खत टोपलीचा वापर करून घरातल्या घरातच कच-याची विल्हेवाट लावत आहेत. मोठ्या सोसायट्या, संस्था, शाळा – महाविद्यालये, उद्योगसमुह, हॉटेल्स यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये 40 मोठ्या सोसायट्या, 19 हॉटेल्स, उद्योग समूह, शिक्षण संस्था यांनी आपल्या जागेत खत निर्मिती प्रकल्प राबवून एक चांगला आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. याचा निश्चितच विचार स्वच्छ सर्वेक्षणात करण्यात आला. या सर्व संस्थांना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अभिनंदन पत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणात मनापासून काम करणा-या महापालिका अधिकारी – कर्मचारी यांचेही चांगल्या कामगिरीबद्दल पत्राव्दारे कौतुक केले आहे व यापुढील काळात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक अग्रेसर राहण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

            सर्वेक्षणाच्या अनुषंगाने हाती घेतलेल्या विविध स्वच्छता मोहिमांमध्ये विविध क्षेत्रात काम करणा-या सेवाभावी, स्वयंसेवी संस्था – मंडळे – महिला बचत गट यांनी मौलिक हातभार लावला. दैनंदिन स्वच्छतेचे उत्तम काम करणारे सफाई कर्मचारी, स्वच्छतेचा संदेश रंगवून शहराला सुशोभित करणारे चित्रकार, पथनाट्य व पपेट शो सादरीकरणातून जनजागृती करणारे कलाकार, विक्रमी वॉकेथॉनच्या माध्यमातून एकजुटीने स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणारे 40 हजारहून अधिक विद्यार्थी तसेच विभागा-विभागांमध्ये निघणा-या रॅलीमधून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणारे विद्यार्थी – शिक्षक, गिनीज बुकमध्ये नोंद होणा-या बाईक रॅलीमध्ये सहभागी उत्साही युवक, चित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेचा चित्रसंदेश देणारे 14 हजाराहून अधिक विद्यार्थी, स्वच्छता उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणारे स्वच्छताप्रेमी नागरिक अशा विविध घटकांनी या स्वच्छता वाटचालीत आपले अनमोल योगदान दिले, म्हणूनच हे यश आपल्या नवी मुंबई शहराला लाभले आहे असे नमूद करत आयुक्तांनी सर्व घटकांचे अभिनंदन करीत आभार मानले आहेत.

      स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नवी मुंबई शहराचा नावलौकीक उंचावण्यासाठी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल अभिनंदन करतानाच आयुक्तांनी स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छ, सुंदर व आरोग्यपूर्ण नवी मुंबईचा नावलौकीक यापुढील काळात अधिक वाढावा यादृष्टीने सर्वेक्षणाच्या माध्यमातून लागलेली स्वच्छतेची सवय अशीच कायम ठेवून इतरांनाही हे स्वच्छतेचे महत्व स्वकृतीतून पटवून देऊया व आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या बाबतीत अधिक अग्रेसर राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया असे आवाहन समस्त नवी मुंबईकर नागरिकांना केले आहे.

      स्वच्छ भारत मिशनच्या वतीने भारत सरकारमार्फत स्वच्छता मोहिमांचे वार्षिक कॅलेंडर जारी करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कॅलेंडरनुसार सन 2018-19 मध्ये दर महिन्याचे वैशिष्टय लक्षात घेऊन सूचित केलेल्या महिनानिहाय कार्यक्रमांनुसार लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा व “शून्य कचरा” संकल्पना राबवून कमीत कमी कचरा निर्माण होईल याची काळजी घ्यावी व  आपण निर्माण करीत असलेल्या ओल्या कच-याची घरातच खत टोपलीव्दारे तसेच मोठ्या प्रमाणातील कच-याची आपल्या सोसायटीच्या, हॉटेल्सच्या, संस्थेच्या, उद्योगसमुहाच्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प राबवून विल्हेवाट लावावी आणि आपण निर्माण करीत असलेला कचरा अतिशय कमी प्रमाणात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.