नवी मुंबई महानगरपालिका

प्रसिध्दीकरीत दि. 16/05/2018 “स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये “घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम” घोषित

????????????????????????????????????
46

 “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2018” ला सामोरे जाताना “माझा कचरा – माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. याचीच परिणिती म्हणून “स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये आज नवी दिल्ली येथे केंद्र सरकारमार्फत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून घोषित कऱण्यात आले.

      “स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये मध्ये इंदौर, भोपाळ व चंदीगढ या तीन शहरांना देशातील सर्वात स्वच्छ शहरांचा अनुक्रमे बहुमान मिळाला. तसेच इतर शहरांना स्वच्छतेच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन 10 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या मोठ्या महानगरांमध्ये देशात सर्वोत्तम असल्याचे घोषित करण्यात आले.

      स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी तसेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासह सर्व अधिकारी – कर्मचारीवृंदाने स्वच्छ सर्वेक्षणाचे काम झोकून देऊन केले होते. नवी मुंबईकर नागरिकांचाही सक्रीय सहभाग स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच वैयक्तिक पातळीवर लाभला होता.

      दररोज घरात निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका असे घरातच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देण्याचे प्रमाण नवी मुंबईत 85 टक्के इतके गाठण्यात यश लाभले असून हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. हा वर्गीकृत साधारणत: 750 मेट्रीक टन कचरा दररोज नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील शास्त्रोक्त भू-भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी योग्य प्रकारे वाहून नेला जात असून त्यावर प्रक्रिया केली जात आहे.

      घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दररोज 100 किलोपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, संस्था यांनी त्यांच्यामार्फत निर्माण केल्या जाणा-या ओल्या कच-यावर त्यांच्या आवारातच प्रकल्प राबवून प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने विविध संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, शिक्षण संस्था, उद्योग समूह यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले.

      कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून ही तंत्रप्रणाली वापरणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. याव्दारे महानगरपालिकेमार्फत वितरण करण्यात आलेल्या कचराकुंडया तसेच कम्युनिटी बिन्समधील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला किंवा नाही याची खातरजमा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत केली जात आहे. त्याचप्रमाणे कचरा वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांचे GPS व GPRS प्रणालीव्दारे नियंत्रण केले जाते, त्यामुळे कचरा वाहतुकीवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे महानगरपालिकेस सहज शक्य होत आहे.

      घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा ओला कचरा प्रक्रिया करून सेंद्रीय खतात रुपांतरीत केला जात असून त्याला शेतीसाठी चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे वर्गीकृत सुक्या कच-यामधून प्लास्टिक वेगळे करून प्लास्टिक अॅग्लो तयार केले जातात, ज्याचा वापर प्लास्टिक रिसायकलींग उद्योगात होतो. नवी मुंबई महानगरपालिकेने या ॲग्लोचा वापर प्रायोगिक तत्वावर डांबरी रस्ते निर्मितीत केला असून औद्योगिक क्षेत्रात अशाप्रकारे 10 रस्ते तयार केले आहेत. ज्यामुळे रस्ता अधिक टिकाऊ होऊन पाणी रस्त्याच्या आत न झिरपल्याने त्याचे आयुष्य वाढत आहे.

      घनकचरा व्यवस्थापनामध्ये कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच ओला व सुका असे वर्गीकरण, त्याची स्वतंत्ररित्या योग्य प्रकारे वाहतूक, कचरा वाहतूक करणा-या गाड्यांवर अत्याधूनिक आर.एफ.आय.डी. प्रणालीव्दारे नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया अशा विविध स्वरुपात कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट व नियोजन करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली देशात सर्वोत्तम असल्याचा निर्वाळा ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ च्या निकालामध्ये स्पष्ट झाला आहे.

      स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता संदेश रंगविलेल्या भिंती, जनजागृतीसाठी शहरात विविध प्रकारचे आकर्षक डिझाईन केलेले होर्डिंग-बॅनर्सचे प्रदर्शन, हस्तपत्रके वितरण,शालेय विद्यार्थ्यांची विक्रमी वॉकेथॉन, विभागाविभागात जनजागृतीपर रॅली व चित्रकला स्पर्धा आयोजन, पथनाट्य सादरीकरण, वॉल पेंटींग, पपेट शो, विविध स्वच्छता मोहिमा, नमुंमपा सेवेतील वाहने वबसेसवर स्वच्छ सर्वेक्षण-2018 बाबत स्टिकर्स, ध्वनीचित्रफिती प्रसारित करणारे मोबाईल स्वच्छताप्रचार वाहन तयार करुन जनजागृती, महानगरपालिकेच्या कचरा गाडयांवर स्वच्छतेच्या जिंगल लावून लोकमानसिकता निर्मिती, नमुंमपा क्षेत्रातील मुख्य चौकात व मुख्यालय येथे स्वच्छ सर्वेक्षण-2018 बाबत 3-D Typographical Art, वॉल पेंटींग करणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता ॲपलाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

      त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा निर्णय हा नवी मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा असून याचे संपूर्ण श्रेय हे नवी मुंबईकर नागरिकांचे असल्याचे मत महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले असून स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वच्छतेची लागलेली सवय ही कायमस्वरुपी रहावी व आपले स्वच्छतेतील स्थान कायम उंचावत रहावे यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक व सक्रीय रहावे असे आवाहन केले आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.